विलंबाने तिकीट घेणार्‍यांवर कारवाई होणार   

पीएमपी प्रशासनाचा निर्णय 

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांबरोबरच विलंबाने तिकीट घेणार्‍यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप ऑनलाइन तिकीट प्रणाली विकसित केली आहे. या ऑनलाइन अ‍ॅपला तांत्रिक अडचण आल्यास किंवा सुट्या पैशांवरून वाद टाळण्यासाठी अत्याधुनिक ई-मशिन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी बस थांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद असतानाही २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचलन तूट ७६६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गांचा विस्तार, नवीन मार्गांवर बसचे संचलन, तसेच ऑनलाइन तिकिटासाठी ऑनलाइन ई-मशिन, अ‍ॅप आणि इतर सेवांमधील त्रुटी दूर करून नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
प्रवाशांनी बसलेल्या बसथांब्यावरून त्वरित तिकीट घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ऑनलाइन तिकीट घेताना नेटवर्कमुळे तिकीट वितरित होण्यास विलंब होत असल्यास वाहकाकडून ई-मशिनद्वारे रोखीने तिकीट घ्यावे लागेल.
 
प्रवाशांकडून गर्दीचा फायदा घेत विलंबाने तिकीट घेतले जात आहे. अनेक प्रवासी नियोजित ठिकाणी उतरण्यापूर्वीचा थांबा सांगून तिकीट काढून कमी पैशांत प्रवास करीत असून वाहक आणि प्रवाशांमध्ये वादविवादाच्या घटना होत आहेत. प्रवाशांकडून गर्दी आणि ठरावीक अंतरावर असणारे बसथांबे याचा गैरफायदा घेतला जात असल्याने प्रवासी ज्या बस थांब्यावर बसेल तेथूनच ऑनलाइन तिकीट काढणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
-नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

Related Articles